खळबळजनक ! ‘भाईजान’ सलमानचा ‘खात्मा’ करण्यासाठी 30 लाखांची ‘सुपारी’, ‘या’ शार्प शूटरचा ‘कबुली’नामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘भाईजान’ अर्थात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मारण्यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये अटक झालेल्या शक्ती नायडू गँगचा शार्प शूटर रवी भुरा याने ही सुपारी घेतल्याची कबुली पोलीस चौकशीदरम्यान केली. जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपविण्यात येणार होते, असा धक्कादयक खुलासा त्याने यावेळी केला.

गेल्या आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला होता. रवी हा मुझफ्फरनगरच्या रायशी येथील रहिवासी असून सध्या तो दिल्लीमध्ये स्थायिक होता. दरम्यान, शुक्रवारी तो पुष्प विहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी साखळी रचत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रेल्वे रोडच्या दिशेने पळून जाऊ लागला. त्यांनतर त्याच्या माणसांनी पोलिसांवर गोळीबार केला. यावर पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. त्याच्यासोबतचे साथीदार पिंटू बंगाली आणि नितीन सैदपुरिया पळून जाण्यात यशस्वी झाले, आणि रवी जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला.

दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रवीने चौकशी दरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहे. त्यात, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले असल्याचे सांगितले. त्यांनतर धक्कादायक म्हणजे रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला मारण्याची सुपारी घेतली होती. हे काम तो केवळ 30 लाखांत करणार होता.

रवीने सांगितल्याप्रमाणे , 5 जानेवारी 2018 मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. त्यावेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला मारण्याची धमकी दिली होती. त्यांनतर आता रवीने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार आहेत, अशी माहिती पुलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. महत्वाचे म्हणजे संपत नेहरावर पाच लाखांचे बक्षिस होते. त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. सध्या संपत तिहार जेलमध्ये आहे.

दिल्लीचे एसीपीही निशाण्य़ावर :
दरम्यान, 30 जानेवारीला मेरठच्या वैष्णो धामचे इन्स्पेक्टर विपीन आणि प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यासाठी याच गँगचे काही जण आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगी यांनादेखील संपवायची सुपारी या गँगने घेतली होती. नेगी यांनी शिव शक्तीवर मोक्का लावला होता. नेगी परतापूरमध्ये एका लग्न समारंभाला आले होते. मात्र, गँगचा एक सदस्य आणि नेगी यांचा पुतण्या असलेल्या तिलकराजने नेगी यांना मारण्यास नकार दर्शविला. यामुळे त्याची हत्या करण्यात आली.