‘तसले’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २५ कोटींची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : पार्किसन आजाराने ग्रस्त असलेल्या चित्रपट निर्मात्याच्या वडिलांना मालीश करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्यासोबत अश्लील छायाचित्रण केले. त्यानंतर ते वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्याची धमकी देत २५ कोटींची खंडणी मागितली. त्यातील ५ लाख रुपये घेताना अंबोली पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात एका चित्रपट निर्मात्याने तक्रार केली आहे.

माही लकी मिश्रा (वय ३२), हुसेन हनीफ मकरानी (वय ३६), रेहमान अब्दुल वाहिद शेख (वय ४५) आणि युवराजसिंग चौहान (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पार्किसन विकाराने ग्रस्त असलेल्या निर्मात्यांच्या वडिलांना डॉक्टरांनी मालीश घेण्याचा सल्ला दिला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांची ओळख माही लकी मिश्रा नावाच्या महिलेशी झाली. ती महिला थेरपिस्ट असल्याचे तिने त्यांना सांगितले. ऑक्टोबर, २०१८ मध्ये त्यांनी तिला मालीशसाठी बोलावले. त्यानुसार ती आली आणि मसाज देऊन निघून गेली. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये या निर्मात्याला मिश्राच्या मोबाइल क्रमांकावरून राहुल शुक्ला नामक इसमाचा फोन आला. मी ‘डिस्कव्हरी ऑफ क्राइम मीडिया’मधून बोलत आहे. तुमच्या वडिलांची आक्षेपार्ह अवस्थेतील क्लिप आमच्याकडे आहे. त्याचे काय करायचे ? अशी विचारणा त्याने निर्मात्याकडे केली. आणि हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची मागणीही केली. त्यांनी वडिलांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा असा काहीच प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या निर्मात्यास सतत वेगवेगळ्या क्रमांकांवरून पैशासाठी फोन येऊ लागले. त्यांच्या दोन मित्रांनादेखील वाटाघाटी करण्यासाठी त्रास दिला जाऊ लागला. हे प्रकरण वृत्तवाहिनीवर प्रसारित करून बदनामी करण्याचीही धमकी त्यांना दिली जाऊ लागली. यासाठी गोरेगाव, खार, अंधेरीमध्ये त्यांनी त्यांची भेट घेतली.  सुरुवातीला पाच लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती. अखेर या निर्मात्याने २१ फेब्रुवारी २०१९ रोजी एक तक्रार अर्ज अंबोली पोलिसांना दिला.

या प्रकरणी चौकशी सुरू करत निर्मात्याला खंडणी मागणाऱ्यांना अंधेरीच्या कॅफे कॉफी डेमध्ये भेटायला बोलावण्यास सांगितले. पोलिसांच्या सल्ल्यानुसार त्यांना पैसे घेण्यास बोलावले. तेव्हा माही लकी मिश्रा हिच्यासह हुसेन हनीफ मकरानी रेहमान अब्दुल वाहिद शेख आणि युवराजसिंग चौहान हे त्या ठिकाणी आले. हुसेनने या निर्मात्याकडील पाच लाख रुपये ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी खेचून घेतली आणि ती मिश्राच्या हातात दिली. त्यावेळी सापळा रचून थांबलेल्या पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबूल करत आणखी तिघे जण यात सहभागी असल्याचे पोलिसांना सांगितले.