निवृत्त नौदल अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी कलाकारांचा संताप

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत निवृत्त नौदल अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अभिनेत्राी कंगना रणौत, स्वरा भास्कर, प्रिती झिंटा यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत घटनेचा निषेध केला आहे. निवृत्त नौदल अधिकार्‍याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र व्हॉट्स अ‍ॅपवरुन फॉरवर्ड केले होते. त्यावरुन त्यांना मारहाण करण्यात आली.

लोकशाहीमध्ये अशा हिंसाचाराला अजिबात थारा दिला नाही पाहिजे. जर कायदा व सुव्यवस्था राखली जात नसेल तर त्याला सुशासन म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करने शिवसेनेवर टिका केली. अभिनेत्री प्रिती झिंटानेही ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले? ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करण्याची शिकवण कुठे गेली? हे अजिबात योग्य नाही,’ असे ट्वीट तिने केले आहे. शिवसेनेच्या सात गुंडांनी निवृत्त नौदल अधिकार्‍याला मारहाण केल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला होता. मुंबईतल्या कांदिवली भागातल्या शाखा प्रमुखाने ही मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. हीच माहिती ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना गुंडाराज थांबवा असं म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांकडून शिवसेनेला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा पृयत्न केला जात आहे.