समाजात तेढ निर्माण करून सत्ताधारी राजकीय फायदा घेत आहेत : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकिकडे अमेरिकेच्या अध्यक्षांचे स्वागत केले जाते आणि दुसरीकडे भारतातील एका वर्गावर हल्ले केले जातात. केंद्रातील सत्ताधारी हे एका सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला आहे. ते मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले, राज्यकर्ते जर चुकीचे वागायला लागले, राज्यकर्तेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते. त्यामुळे दिल्लीत जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्राची आहे, असा आरोप देखील शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री इतर मंत्र्यांचा रोख हा देशाच्या सामाजिक धार्मिक ऐक्याला छेद देणारा होता. यांचा मंत्री म्हणतो गोळी मारा. सत्ता ही रक्षण करण्यासाठी असते तर त्यांचेच मंत्री असे वक्तव्य करत आहेत. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्रपती दिल्लीत येतो आणि त्याचवेळी एका वर्गावर हल्ला होतो, असे शरद पवार म्हणाले.

दिल्लीमध्ये सर्व प्रदेशातून लोक इथं येऊन राहतात. सांप्रदायिक विचाराने राजकारण करण्याचा पाडाव दिल्लीच्या नागरिकांनी केला. भाजपला सत्तेपासून लाभ ठेवल्या बद्दल दिल्लीकरांचे अभिनंदन करायला पाहिजे. आपल्याला हवे असलेले होत नसल्याचे पाहून दिल्लीत आग आणि दगडफेड करण्यास सुरुवात केली. यामागे सत्ताधारी पक्ष आहे. धर्म आणि जातीच्या आधारावर दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शरद पवार म्हणाले.