…म्हणून शरद पवारांनी 1 मार्चपर्यंत केले सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 21) जनतेला संबोधित करताना काही निर्बंध जारी केले आहेत. राज्यातील सर्व राजकीय, सामाजिक व सरकारी कार्यक्रम 28 मार्चपर्यंत रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही 1 मार्चपर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

राज्यात पुढील काही दिवस राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना बंदी घातली आहे. यामध्ये मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, यात्रा, जाहीर सभा आदींचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेले आवाहन लक्षात घेऊन पवार यांनी आपले कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित करताना म्हणाले की, ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहे, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत त्यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.