मोदी आता माझा सल्ला घेत नाहीत : शरद पवार यांचे स्पष्टीकरण

ADV
गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मी शरद पवार यांचा सल्ला घेतो असे म्हणत. सुरुवातीच्या दीड वर्षांपर्यंत अधुनमधून फोनही करायचे. आता माझा सल्ला तर सोडा स्वत:च्या पक्षातील खासदार आणि मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा अंदाज येतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गोंदियात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, पंतप्रधान हे पद लोकशाहीत वरच्या स्तराचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानांनी पदाचा अवमान होईल, असे भाष्य केले नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरिमा न ठेवता महिला आणि इतरांवर वैयक्तिक भाष्य केले. येत्या पाच ते सहा महिन्यांत निवडणुका होणार आहेत. आता देशातील जनता या सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे सत्ताबदल होणार आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, असेही ते म्हणाले. वेगळा विदर्भ, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पवार यांनी मत मांडले.

गोंदिया जिल्हा हा राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये धानाचे भाव प्रति क्विंटल अडीच हजार रुपये आहेत. मात्र, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १७४० रुपये धानाला भाव आहे. त्यासोबत अद्याप भाजप सरकारने धानाला बोनस जाहीर केला नाही. ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. मुख्यमंत्री विदर्भातील असतानाही धानाला भाव नाही ही मोठी शोकांतिका आहे. सत्तेवर येताच धानाचे भाव अडीच हजार रुपये करणार, अशी घोषणा पवार यांनी केली.