पंकजांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा मोदी स्टाईल प्रचार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – डिजिटल तंत्रज्ञान आता इतर क्षेत्रात वापरले जाते तसे राजकीय क्षेत्रात देखील वापरले जात आहे. रिमोटद्वारे उदघाटन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सभा या सगळ्या गोष्टी राजकारणात देखील वापरल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करुन जनतेशी संवाद साधल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तंत्रज्ञानाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड येथे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि नेते मंडळींची उपस्थिती होते. आगामी लोकसभेसाठी बीड येथील चुरस चांगलीच रंगणार असे दिसत आहे. बीड येथे राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे.

पंकजांनी 106 कोंटींचा मोबाईल घोटाळा केल्याचा धनंजय यांचा गंभीर आरोप

ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनी 106 कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये 106 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं धनंजय यांनी म्हटलं आहे. चिक्की घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंच्या अधिपत्याखाली असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्याच्या 30 जिल्ह्यातील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रासाठी जवळपास लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंकजा यांच्या विभागाने पॅनासोनिक इलुगा 17 हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून हा मोबाईल खरेदी केला जाणार आहे. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) 28 फेब्रुवारी 2019 रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मुख्य म्हणजे संगणक माहिती सक्षम रियल-टाईम-माॅनिचरींग (आयसीटी-आरटीएम) याेजनेसाठी हा स्मार्टफोन खरेदी करण्यात येत आहे.

दरम्यान, पॅनासोनिक इलुगा 17 हा स्मार्टफोन खरेदी करताना कंपनीला प्रत्येक मोबाईलमागे सुमारे 2200 रुपये जास्तीची रक्कम देण्यात आला आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा 17 या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत 6 हजार 499 रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल 6000 ते 6400 रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना 8 हजार 777 रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे 2200 रूपये इतकी वाढविण्यात आली आहे.

इतकेच नाही तर, कसलीही आवश्यकता नसताना महिला व बाल कल्याण विभागाने एम एस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून अतिरीक्त 5100 मोबाईल खरेदी केले आहेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारी कामासाठी अशी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यापूर्वी कंपनीची पडताळणी करणे, गरजेचे असते. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीचा पत्ताही निविदा कागदपत्रात दाखवण्यात आला नाही. त्यामुळे त्यात नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देत, तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

भाजप कार्यकर्त्याची गुंडगिरी : कंपनीत घुसून मॅनेजरला मारहाण

कबड्डीपटूची भूमिका असलेला कंगनाचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

कोल्हापुरात राष्ट्रवादीला काँग्रेसकडून उघड-उघड विरोध

दैवी शक्ती असल्याचे सांगून बलात्कार केल्या प्रकरणी ७५ वर्षीय नागरिकाची निर्दोष मुक्तता