#Surgicalstrike2 : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर काय आहे शरद पवार यांची प्रतिक्रिया 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हवाई दलाला सलाम केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ज्या दहशतवादी कारवाया केल्या जातात त्याला भारतीय दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरुन तीन ठिकाणी केलेला हल्ला हा तब्बल २१ मिनिटे सुरु होता. त्यात बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे सर्वात मोठे दहशतवादी मुख्य ठाणे तसेच चकोटी आणि मुज्जफराबाद येथील हिज्बुल आणि लष्करचे कँपही या हल्ल्यात उध्वस्त करण्यात आले. पंजाबमधील आदमपूर हवाई तळावरुन मिराज २००० विमानांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण घेतले. काही मिनिटातच त्यांना ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या दिशेने त्यांनी कुच केली.

बालाकोट हे जैश-ए-मोहम्मदचे सर्वात जुने व पाकिस्तानच्या हद्दीतील खूप आतमध्ये असलेले ठिकाण आहे. भारतीय हवाई दलाने १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन खोलवर सर्वप्रथम कारवाई केली. ही कारवाई सुरु असतानाच पहाटे पावणे चार वाजता काही विमानांनी मुजफ्फराबाद येथील तळावर हल्ला केला. जवळपास ८ मिनिटे हा हल्ला सुरु होता. त्याचवेळी चकोटी येथे ३ वाजून ५६ मिनिटांनी हल्ला केला. भारतीय विमानांनी तब्बल ९ मिनिटे जोरदार बॉम्बफेक करुन येथील तळ उद्धस्त केले. त्यानंतर सर्व १२ विमाने पुन्हा पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर सुखरुपपणे परत आली.

चकोटी आणि मुजफ्फराबाद ही दोन्ही ठिकाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवर भारताचा हक्क असल्याने आम्ही कोणतीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही, असे म्हणू शकतो. बालाकोट हे जैश-ए-मोहम्मदचे मोठे ठाणे राहिले आहे. अजहर मसूद हा नेहमी या ठिकाणी येत असल्याची माहिती भारताचे माजी संरक्षण सचिवांनी दिली आहे.

हवाई हद्दीचा भंग केल्याचा पाकिस्तानचा आरोप
दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा भंग करुन बालाकोट येथे कारवाई केल्याचा आरोप पाकिस्तानच्या लष्कराच्या वतीने करण्यात आला आहे.

पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मोदी आज राजस्थानमध्ये एक जाहीर सभा घेणार होते.