मुखईतील भैरवनाथ मंदिरात चोरी प्रयत्न ! घटना CCTV मध्ये ‘कैद’, शिक्रापुर पोलीस स्टेशनमध्ये FIR

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील मुखई येथील भैरवनाथ मंदिरात चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून मंदिरातील पुजाऱ्यामुळे चोरीचा डाव फसला असून पुजाऱ्याचा मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले आहे.काही दिवसांपूर्वी याच मंदिरात चोरी होऊन मंदिरातील दागिन्यांसह आदी वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली होती त्या घटनेचा तपास अजून लागलेला नसतानाच पुन्हा मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुखई ता. शिरूर येथील भैरवनाथ मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी चोरी होऊन मंदिरातील देवाच्या चार किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, दोन किलो वजनाचा चांदीचे दोन नागफनी, तीन किलो वजनाचे चांदीचे त्रिशूल, अर्धा किलो वजनाचा चांदीचा नाग, यांसह आदी साहित्य चोरी गेल्याची घटना घडली असून त्या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना ग्रामस्थांनी देवावरील श्रद्धेपोटी पुन्हा देवाचे दागिने खरेदी केले आहेत, रात्री मंदिराचे पुजारी बाळासाहेब पुजारी हे मंदिराबाहेर तर त्यांचा मुलगा संदीप पुजारी हा मंदिराच्या गेटला कुलूप लावून आतमध्ये झोपेलेला होता, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक पक्कड, पहार घेऊन मंदिरात चोरी करण्याच्या हेतूने आले, यावेळी पुजारी बाहेर झोपेलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बाहेरील पुजाऱ्याला दाबून धरले यावेळी झटापटीच्या आवाजाने आतमध्ये झोपलेला संदीप जागा झाला असताना तिघे चोरटे त्यांनी आणलेली पक्कड, पहार तेथेच सोडून बाळासाहेब पुजारी यांचा मोबाईल घेऊन पसार झाले, याबाबत माहिती मिळताच सकाळच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस शिपाई संतोष शिंदे, भास्कर बुधवंत होमगार्ड योगेश बधे यांनी मंदिर परिसरात जात पाहणी करून पंचनामा केला आहे. यावेळी पोलीस पाटील कविता धुमाळ, माजी सरपंच अतुल धुमाळ, रमेश पलांडे, सुरेश पलांडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असून रात्री घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याचे दिसून आले आहे. याबाबत बाळासाहेब सुदाम पुजारी रा. मुखई ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.