शिर्डीतील खून प्रकरण : ससून रूग्णालयातून पलायन करणार्‍या आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून 8 तासाच्या आत अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिर्डी येथील खून प्रकरणातील ससून रुग्णालयात उपचार आणल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी केवळ 8 तासात शोध घेऊन अटक केली.

समीर अक्रम शेख (वय 24, रा. शिर्डी) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समीर शेख याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयाने कोठडीत केली होती. त्याला कोपरगाव कारागृहात ठेवले होते. यादरम्यान त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यासोबत दोन कर्मचारी होते. मात्र उपचार सुरू असताना काल तो ( दि. 29 जानेवारी) पहाटे ससून रुग्णालयातून पसार झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार आता त्याचा शोध घेतला जात होता. यावेळी स्वारगेट पोलिसांनी देखील आरोपींचा माग काढण्यास सांगण्यात आले होते. यादरम्यान पोलीस आमलदार सोमनाथ कांबळे व संदीप साळवे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी सहकारनगर भाग एक या परिसरात थांबला आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले.

समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर 7 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस हवालदार सचिन कदम, मनोज भोकरे, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शंकर गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.