शिरुर : काही महिन्यापुर्वीच दुरुस्त केलेला रस्ता खाजगी गॅस कंपनीने उखाडला

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील सहाच महिन्यांपूर्वी तयार केलेला चौफुला-केंदूर रस्ता महेश गॅस कंपनीने खोदल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही दूर्लक्ष झाले असून या रस्त्याबाबत ना केंदूर ग्रामस्थ बोलत ना करंदी ग्रामस्थ. पर्यायाने महेश गॅस कंपनीच्या गलथान कारभाराला सगळ्यांचे अभय आणि यामध्ये माञ दोन गावांचे नागरिक त्रस्त अशी अवस्था झालेली आहे.

महेश गॅस कंपनीने घरघुती गॅसलाईनच्या नावाने चौफुला ते कनेरसर दरम्यान गेल्या वर्षभरापासून पाईपलाईनचे काम सुरू केले आहे. या कमासाठी खोदून पाईप गाडण्याच्या कामाबाबत केंदूरमध्ये वर्षभरापूर्वी अनेक मतमतांतरे होती तर कंपनीने केलेल्या खराब कामाबद्दल कुणीच आवाक्षरही काढीत नाही. सध्या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाईपलाईन गाडायचे काम सुरू असून त्यासाठी संपूर्ण चौफुला-केंदूर हा सहा किलोमिटरचा रस्ता कंपनीने खोदून आपले काम रेटून सुरू केले आहे. कंपनीच्या कुणाही अधिका-यांना विचारले तर ते थेट जिल्हाधिका-यांचे नाव सांगतात. याबाबत सर्वपक्षीय नेतेही मुग गिळून गप्प बसलेत तर कंपनीला जाब विचारण्याची एकाचीही जिभ रेटत नाही. याच पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते विकासनाना गायकवाड यांनी या संपूर्ण कामाचे फोटो, माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला तसेच कंपनीलाही कळविली असून पुढील महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ववत न केल्यास आंदोलन करून न्यायालयातही आम्ही दाद माघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान केंदूर-चौफुला रस्ता व्हावा ही गेल्या वीस वर्षांची मागणी केंदूर, पाबळ, करंदी आदी गावांची आहे. मात्र एकसलग रस्त्या तर सोडाच उलट केवळ जेमतेम दुरुस्तीचा मुहुर्त सहा महिन्यांपूर्वी लाभलेल्या या रस्त्याची आता महेश गॅस कंपनीने वाट लावली असल्याने केंदूर-करंदीतून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.

या खोदकामाबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागो होतो आणि त्यानंतर ठंड ठोठावणार असे सांगण्यात येते .अशाच प्रकार मागील आठवड्यात नारायणगाव येथे देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर सुमारे अंदाजे ४५ लाख रुपये दंड ठोठावला.

या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आसता त्यांनी सांगितले संबधित खोदकामाला आम्ही रितसर दंड ठोठावणार आहोत .
डी.एम.चौरे शाखा (शाखा अभियंता)

याबाबत महेश गॅस एजन्सी कंपनीचे वरिष्ठ श्रीधर ताभ्रपानी, आणि मिलिंद नरहर शेट्टीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही