राजकारण कुरघोड्या बस्स ! उपाययोजना करा, नागरिकांची हाक

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यामध्ये दिवसें दिवस कोरोना रुग्णांचा संख्येत मोठी वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.तर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे माञ आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप करत आहेत तर भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील एकमेकांवर कुरघोडी करत चिखलफेक करताना दिसत आहे. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून रुग्णांना व्हेंटिलेटर, ॲम्बुलन्स, दवाखान्यात जागा याची कमतरता भासत असताना राजकारणी आणि त्याचे कार्यकर्ते एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त दिसत आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि असंतोष व्यक्त होत आहे.

त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आजी माजी आमदार, तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी आपल्याला रुग्णांसाठी काय करता येइल हे पाहणे सध्यातरी महत्त्वाचे आहे. नक्कीच विद्यमान आमदार अशोक पवार यांनी चांगले काम केलं आहे.परंतु विरोधकांच्या टिकेला उत्तरदेत बसण्यापेक्षा आता घोडगंगा सहकारी साखर कारखाना येथे अद्यावत कोविड सेंटर उभारुण तालुक्यातील रुग्णांची सोय करावी ,तुम्ही या अगोदर कोरोना काळात चांगले काम केले आहे. यानंतरही करणार आहात परंतु आता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

तर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी देखील कोरोना काळात मदत केली परंतु आता विद्यमान आमदारावर टिका करण्यापेक्षा स्वतःच्या बाबुराव नगर येथील वस्तीगृहात कोविड सेंटर उभारणी करावी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल नागरिकांची सोय होइल. तर वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील विषय मार्ग लावणारे संजय पाचंगे यांनी रांजणगाव, सणसवाडी, कोरेगाव, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून तालुक्यामध्ये आद्यावत केविड सेंटर सुरु करण्यासाठी कशा प्रकारे मदत घेता येईल ,कपंन्याकडून व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स यांच्यासह केविड सेंटर साठी तज्ञ स्टाफ, औषधे उपलब्ध करून तालुक्यातील रुग्णांना कशी मदत होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.शिरूर तालुक्यात जवळपास साडेचारशे पेक्षाही जास्त कंपन्या आहेत. जशी कंपनी प्रशासनाला काही प्रमाणात सूट दिली त्याप्रमाणे त्यांच्याकडून मदतही घ्या. कारण सध्यातरी याच औद्योगिक वसाहतीमुळेच शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होताना दिसत आहे. आणि हे कोणी नाकारता कामा नये, त्यामुळे या कंपन्यांकडून व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स यांच्यासह केविड सेंटर साठी तज्ञ स्टाफ, औषधे उपलब्ध करुन घेतले तर त्याचा फायदा नक्कीच शिरूर तालुक्यातील जनतेला होईल यासाठी आता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तुम्ही राजकारण ,कुरघोड्या जरूर करा पण आता ही वेळ नाही आता तुम्ही आमच्या मदतीला या अशी हाक तालुक्यातील नागरिक मारत आहेत. त्यामुळे राजकारण्यानो, कार्यकर्त्यांनो राजकारणाच्या वेळेस नक्कीच राजकारण करा परंतु आज तालुक्यातील रुग्णांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्वानी आपल्या आपल्या परिने प्रयत्न केले तर नक्कीच तालुक्यातील कोरोना रुग्णांना मोठी मदत होईल अशी भावना तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहे.

आता ही वेळ राजकारण करण्याची नाही रोज तालुक्यात नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. अनेक नागरिकांना बेड उपलब्ध होत नाही. अनेक नागरिक उपचाराविना मरत आहेत.त्यामुळे या गोष्टीकडे सगळ्यांनीच लक्ष देणे गरजेचे आहे. एकदा का कोरोना गेला की मग राजकारण करत बसा आता मात्र नागरिकांना सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्या.