Mumbai-Pune Expressway : शिवसैनिकाने चक्क बंदुकीचा धाक दाखवून केलं ओव्हरटेक, व्हिडीओ सोशलवर व्हायरल (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावर वाघ असं चिन्ह दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये, ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

इम्तियाज जलील यांनी ही व्हिडिओ पोस्ट गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग केली आहे. हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे! वाहनावरील लोगो हे सर्व सांगते! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का? असा सवालही जलील यांनी या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.