एकीकडे राम मंदिराचं भूमिपूजन अन् दुसरीकडे अडवाणी अजूनही आरोपीच : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा येत्या 5 ऑगस्टला होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. ’सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणार्‍यांसाठी श्रद्धांजली ठरेल’, असेही शिवसेनेने म्हटले आहे. सामनातून ’रामायण’ या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे.

’आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा!’ असा सवाल उपस्थितीत करत भाजपला टोला लगावला आहे. ’बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही.’ अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. आंदोलनाचा पाया आणि कळस उभारणारे अशोक सिंघल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. लालकृष्ण आडवाणी यांनी रामाच्या नावाने एक रथयात्रा काढली. त्या यात्रेचे सारथ्य करणारे प्रमोद महाजनही निघून गेले. रामाप्रमाणे अडवाणी वनवासात गेले. बिहारच्या वेशीवर अडवाणी यांची रथयात्रा लालू यादव यांनी अडविली व भडका उडाला. अयोध्या पेटली व कारसेवक आक्रमक झाले. याचे श्रेय शेवटी लालू यादव यांना द्यावे लागेल. ते लालू यादवही आज बंदिवान आहेत.’ असा टोलाही भाजपला लगावला.