… तर भाजपने तांडव केल असतं, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून खासदार राऊतांचा निशाणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील WhatsApp संवाद उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी मोदी सरकार गप्प का? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाच सरकार असते आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केले असते.

तसेच देशाच्या सुरक्षेविषयी किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणारी माहिती लीक केली असतानाही कारवाई का होत नाही ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, सीरम इन्स्टीट्यूमध्ये लागलेली आग अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

गोस्वामी यांच्यासारखी माहिती लष्करातल्या जवानाने केली असती तर त्याच कोर्ट मार्शल केल असते. त्याला देशद्रोही ठरवण्यात आले असते. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानले असते असे ते म्हणाले. खासदार राऊत शेतकरी आंदोलनाविषयी म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. तसेच सीरम इन्स्टीट्युटमध्ये लागलेल्या आगीवर बोलताना हा संवेदनशील विषय असल्याचे सांगत तो कट नसून अपघात असल्याचेही ते म्हणाले.