आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही, शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिरे सुरु करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली होती. त्यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी ट्विटवरुन नको, समोर येऊन बोल, असा एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीसांना आव्हान दिलं आहे. ‘ती कोण आहे ? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का ? ती कधी राजकारणात आली ? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,’ असे म्हणत राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.

‘ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिने त्याच भूमिकेत राहावे. आम्हाला हिंदुत्वाचे धडे शिकवू नये. शिवसेनेची राजकारणातील ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करु नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,’ असे प्रतिउत्तर राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिले आहे.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या ?
अमृता फडणवीस यांनी ट्विटवरुन, ‘वाह प्रशासन ! बार आणि दारुची दुकाने सुरु आहेत. मग मंदिर डेंजर झोन आहेत का ? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, तेव्हा त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ असे खोचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांची भाषा दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. मात्र त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

‘त्यांची’ भाषा घटनाविरोधी : बाळासाहेब थोरात
राज्यातील धर्मस्थळे सुरू करण्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातली भाषा घटनाविरोधी असून राष्ट्रपतींना ते मान्य आहे का, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.

आमचं हिंदुत्व पक्क आहे : संजय राऊत
‘उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वच आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.