माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची टीका, म्हणाले – ‘तृप्ती सावंत यांनी शिवसेना अन् बाळासाहेबांचा अवमान केला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र यावरून शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे, अशी टीका माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर केली आहे. मात्र, तृप्ती सावंत यांच्या जाण्याने पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नसल्याचा दावा महाडेश्वरांनी केला.

बाळा सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेने अनेक संधी दिलेल्या आहेत. त्यांना नगरसेवक, आमदार केले. त्यांच्यावर कोणताही अन्याय केला नाही. तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. तृप्ती सावंत कार्यरत नसताना त्यांना आमदारकी दिली.

नारायण राणेसारख्या बलाढ्य उमेदवाराला शिवसैनिकांच्या ताकदीमुळे पराभूत करण्यात यश मिळाले, असे सांगत शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्याने तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. या बंडखोरीचा फटका तृप्ती सावंत आणि महाडेश्वर यांना बसल्याने दोघेही निवडणुकीत पराभूत झाले होते.