शिवसेनेचा BJP ला थेट इशारा, म्हणाले – ‘पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राजीनामे दिल्याने पुद्दुचेरीतील नारायणसामी यांचे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिवसेनेन भाजपला थेट इशारा दिला आहे. पुद्दुचेरी झाल आता महाराष्ट्र अस स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे, असा टोला शिवसेनेने सामनामधून लगावला आहे. महाराष्ट्राच मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत, अशा शब्दात सेनेने भाजपला सुनावलं आहे.

केंद्रीय सत्तेचा वापर करून विरोधकांची राज्यांतील सरकारे पाडायची हे सध्या काही जणांना शौर्य वगैरे वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपने पुद्दुचेरीतील सरकार पाडून दाखवल्यानंतर आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसला सुरु करणार असल्याचे जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेंव्हाही पुढील घाव महाराष्ट्रावर असे जाहीर केले होते. त्यानंतर बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवितो, असे म्हणून झाले. आता पुद्दुचेरीची गोष्ट सुरु आहे, पण जशी दिल्ली बहुत दूर है तसेच महाराष्ट्र तो बहुतही दूर है, असे चित्र आहे. मध्य प्रदेशात महाराजा शिंदे व त्यांच्या समर्थकांना फोडून भाजपने बहुमत विकत घेतले. पुद्दुचेरीतही वेगळे काय घडले? पुद्दुचेरीत सध्या जे काय घडतंय हा राजकीय वेश्या व्यवसाय असल्याचा संताप मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केला आहे. तत्त्व आणि नीतिमत्ता गुंडाळून फक्त सत्ता मिळविण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते चिंताजनक आहे. प. बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू-कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही.

पुद्दुचेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी अन् लटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रातही करून झाले. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी यांच्या सरकारला धड काम करू दिले नाही. अर्थात, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी कराव्या लागतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले, हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाजपवाल्यांनी समजून घ्यावे, असे टीकास्त्र शिवसेनेने सामनातून भाजवर सोडले आहे.