Coronavirus : ‘कोरोना’वर उपचार घेत असलेल्या शिवसेना नगरसेवकाचे ठाण्यात निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील भाईंदर येथील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना ठाण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबाबत शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

प्रताप सरनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाईंदरचे शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या निधनाची बातमी खूपच धक्का देणारी आहे. गेले काही दिवस ते कोविड वर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्व ते प्रयत्न केले गेले. तमाम शिवसैनिक व मीरा भाईंदरच्या जनतेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांची काल रात्री प्रकृती अत्यावस्थ झाली होती, असे सुत्रांनी सांगितले. आमगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्याने शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मतदारसंघात शोकाकुल वातावरण आहे. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग सामान्य नागरिकांसह सिने कलाकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांनादेखील मोठ्याप्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. यापासून राजकीय क्षेत्रसुद्धा अबाधित राहिलेले नाही.