‘रोडरोमियो ‘सारखे आमच्या मागे का लागता ? : भाजपावर संजय राऊतांचा ‘धनुष्यबाण’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचं घोंगडं अद्याप भिजतच आहे. एकीकडं भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेनेचा हात हवा आहे पण सेनेनं साथ दिली नाही तर त्यांच्याशी दोन हात करू असा भाजपचा पवित्रा आहे. पण भाजपच्या याच मुद्द्यावरून  शिवसेना मात्र स्वबळाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं दिसते आहे. आज पुन्हा एकदा याचीच प्रचिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडूनही आली. ‘रोडरोमियो’ सारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे.
आम्हाला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाही
‘भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मित्रपक्षांना ‘पटकावण्याची’ भाषा गर्दीसमोर केली. आम्हीसुद्धा गोरेगावमध्ये ‘एकला चलो रे’ चा आवाज दिला आहे. आम्ही नाही नाही म्हणत असताना आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत आमच्या मागे ‘रोडरोमियो’ सारखे का लागता? असं मागे लागणं हे कायद्याने गुन्हा आहे. आम्हाला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाही. अशाने तुमचंच हसं होईल. प्रेमवीरांसारखं फ्रस्ट्रेशन निघेल. प्रेमवीर कसा वेडा होतो किंवा आत्महत्या करतो’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
तेव्हा युती तोडू नका असे का म्हणाले नाहीत ? 
‘२०१७ ला आम्ही स्वबळाचा नारा दिला. २०१४ ला भाजपने युती तोडली, आम्ही नाही. मग तेव्हा अमित शाह भाजप नेत्यांना युती तोडू नका, असं का म्हणाले नाहीत? आता का झोंबलं? असा प्रश्नही संजय राऊत यांनी केला. ‘तेव्हा म्हणाले की गाडा, पण आम्ही गाडलो गेलो नाही, आता म्हणतात जोडा, आम्ही मातीतले कार्यकर्ते आहोत, तलवारीला धार काढून बसलोय’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
आमची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव घेतला आहे, त्याला काही महत्वाचं आहे की नाही. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. आमचा पक्ष आदेशावर चालतो. आम्ही स्वबळावरच लढणार, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
आम्हाला असं कळतंय की शिवसेनेचे मंत्री राजीनामा देत नाही, म्हणून भाजपचे मंत्री राजीनामे देणार. द्या मग आम्ही बघतो, असं आवाहनही संजय राऊत यांनी भाजपला दिलं.
काय म्हणाले होते अमित शाह?
आगामी निवडणुकीत भाजपसोबत न जाण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता.
शिवसेनेसोबत युतीबाबतच्या कन्फ्युजनमधून (संभ्रम) कार्यकर्त्यांनी बाहेर पडावं. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धूळ चारु. त्यासाठी प्रत्येक बूथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजप ४८ पैकी किमान ४० जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला होता.