शिवसेनेचा सामनातून सवाल ! म्हणाले – ‘PM मोदींनी छगन भुजबळांपेक्षा वेगळं काय सांगितलं?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. यामुळे काही राज्यांनी परिस्थितीनुसार आपल्या राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यानुसार महाराष्ट्रात सुद्धा कठोर निर्बध लागू करण्यात आले आहे. तर लॉकडाऊन वरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवाच देशवासियांना संबोधित केले. यांच्या सवांदावरून आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. परंतु, संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.

सामना अग्रलेखातून काय म्हणाले?
१. नॉर्वे देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या जन्मदिनी १० लोकांना परवानगी असताना १३ लोक बोलावले तेव्हा तेथील पोलिसांनी आपल्याच पंतप्रधानांस जबर दंडाची शिक्षा सुनावली होती. हे आपल्या देशात केवळ सामान्यांच्या बाबतीत होऊ शकते. इतरांच्या बाबतीत काय आणि कसे ते पश्चिम बंगालात दिसून आलेच आहे. देशातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडली आहे हे पंतप्रधानांनी मान्य केले, मात्र, करायचे काय ते सांगितले नाही. करोनाचा सामना करणे एकटय़ादुकटय़ाचे काम नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे, असे महाराष्ट्राचे एक वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कालच्या भाषणात त्यापेक्षा वेगळे काय सांगितले?

२. महाराष्ट्रासारख्या राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन हाच पर्याय असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘लॉकडाउन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. राज्यात करोनाचा संसर्ग वाढला आहे. कालच्या २४ तासांत ६४ हजार रुग्ण एका महाराष्ट्र राज्यात झाले. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान १५ दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करा, अशी राज्याच्या अनेक मंत्र्यांची मागणी आहे. परंतु,‘ लॉकडाउन टाळा’’ असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांचे कौतुक केले. छोटय़ा-मोठय़ा समित्या स्थापन करून तरुणांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी सर्वांना भाग पाडले, अर्थात पश्चिम बंगालातील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे राजकीय मेळावे वगळून. तेथे त्या समित्यांची मात्रा चालली नाही. देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे व त्यावर केंद्र सरकार थातुरमातुर उत्तरे देत आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीत कोरोना रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडून प्राण सोडत आहेत. दिल्ली हाय कोर्टाने केंद्राला याबाबत फटकारले आहे. पंतप्रधान किंवा त्यांच्या सहकाऱयांनी ऑक्सिजनपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

३. केंद्र सरकारनेही गेल्या आठवडय़ात ‘CBSE’च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रातही १० वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्याची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून गुजरात सरकारने २ आठवडय़ांचे लॉकडाउन लागू करावे अशी शिफारस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कठोर निर्बंध लावूनही करोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे लॉकडाउन हीच अत्यावश्यक सेवा बनली आहे. अशा गंभीर परिस्थितीशी सामना कसा करावा याबाबत पंतप्रधान जनतेला दिलासा देतील असे वाटत होते.

४. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पोर्तुगालचा नियोजित दौरा रद्द केला हे ठीक झाले; परंतु, त्यांनी पश्चिम बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग थांबवता आला असता. पश्चिम बंगालातील प्रचारासाठी भाजपने देशातील लाखो लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन आपापल्या राज्यांत परतले. त्यामधील अनेक जण कोरोनाने बेजार आहेत. हरिद्वारचा कुंभमेळा आणि पश्चिम बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला केवळ कोरोनाच मिळाला. राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायचे असतात. इतर देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी असे निर्बंध स्वतःवर घालून घेतले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेला प्रवचन द्यायचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था भविष्यासाठी उद्ध्वस्त झाली आहे. जे करोनातून वाचतील ते कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेखाली गुदमरून मरतील. अशी सडकून टीका आणि सवाल शिवसेनेने सामनामधून व्यक्त केला आहे.