धक्कादायक ! शिरुर तहसीलच्या आवारातून ट्रक मधील वाळू कमी करून दंड कमी करण्याचा प्रयत्न; 2 महसूल कर्मचारी ,’राजकीय दलाल’, ट्रक मालकासह 6 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे जिल्ह्याचे शिरूर महसूल मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर तहसीलदार कार्यालय आवारातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पकडलेला हायवा ट्रक वर दंडाची रक्कम कमी करण्यासाठी हायवा ट्रक महसूल आवारातून चोरून घेऊन त्यातील वाळू कमी करून पुन्हा तहसील कार्यालय आवारात आणून लावल्या बाबतचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणी तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी, एक राजकीय दलाल, हायवा मालक व त्याचे साथीदार असे सहा जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही सर्व घटना तहसील कार्यालय आवारातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली.

याबाबत तलाठी सरफराज देशमुख यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून विजय धोंडीबा कोळपे (रा. निमोने कुऱ्हाडवाडी ता. शिरूर जि. पुणे), सुरेश ठकाजी पाचर्णे (रा. तरडोबाचीवाडी शिरूर जिल्हा. पुणे), संभाजी सुकलाल गुंजाळ (महसूल सहाय्यक), नारायण गणपत डामसे (दोघेही तहसील कार्यालय कर्मचारी), संतोष अशोक गिरमकर (कुऱ्हाडवाडी निमोणे ता शिरूर), महेश गणपत अनुसे (निमोणे ता शिरूर) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार 8 मार्च रोजी मंडलाधिकारी शिरूर यांना अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक एम एच १२ आर एम ९९७० हा कुऱ्हाड वाडी परिसरात मिळून आला होता. त्याचा पंचनामा करून त्यात सहा ब्रास वाळू मिळून आली होती. सदर हायवा ट्रक पुढील कारवाईसाठी शिरूर तहसील कार्यालय येथे लावला होता. यासाठी हायवा ट्रक मालक विजय कोळपे याला तहसील कार्यालय यांच्याकडून ४ लाख ४७ हजार ७७५ रुपये दंडाची नोटीस दिली होती.

माञ 19 मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास ते 20 मार्च पावणे एक च्या दरम्यान हायवा ट्रक एम एच १२ आर एम ९९७० चे मालक विजय कोळपे यांना दंडाची नोटीस दिली असताना सदर दंड कमी करण्यासाठी विजय कोळपे याने संभाजी गुंजाळ, नारायण डामसे, सुरेश पाचर्णे, संतोष गिरमकर, महेश अनुसे या सर्वांनी मिळून महसूल कार्यालय शिरूर मधील शिपाई यांना हाताशी धरून आपआपसात संगणमत करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना मिळून आलेला हायवा ट्रक एम एच १२ आर एम ९९७० महसूल विभागाचे कायद्याची रखवाली असताना तो तहसील कार्यालयाचे गेटमधून बाहेर नेऊन त्यामध्ये असलेली अवैध वाळू अंदाजे पाच ब्रास कोठेतरी टाकून दिली आहे. व पुन्हा ट्रक तहसील कार्यालयाचे गेट मध्ये आत आणून लावला आहे. हि सर्व घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेने हा गुन्हा उघडीस आला आहे.
शिरूर चे तलाठी सरफराज तुराब देशमुख यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली वाहने व वाळू चोरून नेऊन जेथे टाकली होती. ती वाळू जप्त केली आहे. वरील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

शिरूर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे राजकीय नेत्याच्या नाव वापरुन दलाली करणारा एका राजकीय नेत्यांमुळे सर्वच खात्यामध्ये, नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याच्या विरोधात अटकेची कारवाई झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शिरूर तहसीलदार कार्यालय असे अनेक राजकीय दलाल यांचा मोठा वावर असून, वाळूच्या जागी क्रश सॅड दाखवणे, वाळू कमी दाखवणे, अशी कामे करत असतात, महसूलचे काही कामे हे दलाल करत आहेत. यांच्यावरही महसुल प्रशासनाने कडक भूमिका घेणे गरजेचे आहे.