खळबळजनक ! भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळ्या ‘बेछुट’ गोळीबार

मुंगेर : वृत्तसंस्था – बिहारमध्ये भाजपचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यात शमशी गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. बुधवारी (दि. 27) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना मुंगेर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे नितीश कुमार यांच्या सुशासनावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

भाजपाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ शमशी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आहेत. यात त्यांना एक गोळी लागली आहे. शमशी यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना पाटणा येथे नेण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. शमशी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच डीजीपी एस. के. सिंघल यांच्यासोबत चर्चा करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

अजफऱ शमशी हे मुंगेरच्या जमालपूर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. घटनेच्यावेळी ते त्यांच्या गाडीने कॉलेजलाच जात होते. ते गेटवर पोहोचताच त्यांनी चालकाला गाडी तिथेच पार्क करण्यास सांगितले. तेवढ्यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. शमशी हे जमिनीवर पडल्याचे त्यांच्या चालकाने पोलिसांना सांगितले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून तपास सुरु केला आहे.