धक्कादायक ! भरदिवसा घरात घुसून गरोदर महिलेला ‘विवस्त्र’ करण्याचा प्रयत्न

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट, औरंगाबाद आणि लासलगाव या ठिकाणच्या घटना ताज्या असताना वसईमध्ये भरदिवसा एका गरोदर महिलेच्या घरात घुसून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून दोन अज्ञातांनी घरात घुसून महिलेचा विनयभंग करत फोटो काढले. हा प्रकार दुपारी पवणेबाराच्या सुमरास घडला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते. घटना घडली त्यावेळी पीडित महिला घरामध्ये एकटीच होती. घरात कोणी नसल्याचे पाहून आणि महिला घरात एकटी असल्याची संधी साधून दोन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती.

महिलेचा पती कामावर गेल्याने महिला घरात एकटी होती. दुपारी पावणेबाराच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी इसमांनी पती कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यावर महिलेने ते कामावर गेल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हाला तुमच्याशी बोलायचे असल्याचे सांगून ते दोघे जबरदस्तीने घरात घुसले. महिलेला धक्का देऊन त्यांनी तिचा विनयभंग केला. यावेळी तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून तिचे फोटोही काढले. महिलेने तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेची सत्यता पडताळून कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.