दुर्दैवी ! खासगी रुग्णालयात नाही झाले उपचार, 2 बालकांचा जीव गेला

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – एकामागे एक अशी तब्बल आठ रुग्णालयांचे दार ठोठावल्याने पण एकानेही दाखल करुन न घेतल्याने उपचारास विलंब झालेल्या दोन वेगवेगळ्या बालकांचा शुक्रवारी ( ७ ऑगस्ट) मृत्यू झाला. या बालकांना ज्या ज्या रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दोन्ही बालकांच्या नातेवाईकांनी केली.

शहरातील कल्यानरोड येथील अफसरा टॉकीज परिसरातील फिजा बेकरी येथे राहणाऱ्या यमशेद अन्सारी यांचा १४ महिन्यांचा मुलगा हाशिर पाण्याच्या टब मध्ये पडल्याने त्याला दुखापत झाली. तर दुसरीकडे याच दिवशी गौस शेख यांचा ३ महिन्यांचा मुलगा सैफ याची मालिश करताना त्याने उलटी केली. दोघांच्या देखील पालकांनी शहरातील विविध आठ खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना फिरवले. पण एका सुद्धा खासगी रुग्णालयाने या मुलांना उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही. काही रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याने कारण दिले तर काहींनी रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने कारण दिले. शेवटी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवण्यात दोन्ही परिवारांचा वेळ गेला. त्यानंतर रात्री उशिरा धामणकर नाका येथे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या ऑरेंज या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले.

दरम्यान, रुग्णालयांनी दाखल न केल्याने आपल्या मुलांचा जीव गेल्याची भावना या दोन्ही नातेवाईकांनी व्यक्त केली. तसेच या आठही रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत बालकांच्या नातेवाईकांनी केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली गेली. तर महापालिकेने या आठही रुग्णालयावर कार्यवाही करुन पीडित कुटूंबाला न्याय दिला नाही तर महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, राष्ट्रवादीने दिला.