Coronavirus : CRPF चे आणखी 6 जवान कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक आकडा समोर येत आहे. त्यात आता नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. खारघर येथे नियुक्त असलेल्या १३९ अधिकारी आणि १२ जवानांपैकी ५ जणांना या आधीच कोरोना झाल्याचे समजले होते. त्यात आता आणखी सहा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

२ एप्रिलला रात्री उशिरा कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात या १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या सगळ्यांची कोविड-१९ चाचणी घेण्यात आल्यानंतर त्यातलं सहा जण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांनतर तातडीने केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना आयसोलेशनमध्ये ठेवल्यामुळे संभाव्य धोका कमी झाला. त्यांच्यावर उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे कोणताही रिपोर्ट आल्यास तेथील प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन पुढची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.