दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी एस.एन. श्रीवास्तव, मुंबईत देखील बदल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (CAA) च्या नावाखाली भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस.एन. श्रीवास्तव आता दिल्लीचे पुढील पोलिस आयुक्त असणार आहेत. ते पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांची जागा घेणार आहेत. श्रीवास्तव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊटच्या दरम्यान श्रीवास्तव यांनी सैन्यासह हिज्बुल मुजाहिद्दीनचा पूर्णपणे खात्मा केला होता.

दरम्यान, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुधोब जयस्वाल हे दिल्लीत पोलिस आयुक्त म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जातील असा अंदाज काही जणांनी बांधला होता. मात्र, दिल्लीच्या आयुक्तपदी श्रीवास्तव यांची नियुक्ती झाल्याचे जयस्वाल हे महाराष्ट्रातच पोलिस महासंचालक म्हणून कायम राहणार आहेत. मात्र, मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या एक्सटेन्शनचा कार्यकाल संपला असल्याने मुंबईत देखील बदल होणार हे निश्चत आहे.

एस.एन. श्रीवास्तव हे दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर सेलचे विशेष आयुक्त राहिलेले आहेत, त्यांना यापूर्वी सीआरपीएफच्या पश्चिम विभागाचे एडीजी देखील बनवण्यात आले होते. एडीजी असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना पूर्णपणे संपवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले होते.

१९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी एस.एन. श्रीवास्तव यांची गणना अशा शूर आणि धाडसी अधिकाऱ्यांमध्ये केली जाते, ज्यांनी काश्मीरमधील अतिरेक्यांवर बारीक नजर ठेवली आणि दहशतवादापासून मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली. जेव्हा श्रीवास्तव यांना २०१७ मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये सीआरपीएफमध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी दहशतवादविरोधी कारवाई केली. यादरम्यान हिज्बुलचे मोठमोठे कमांडर मारले गेले.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ बरोबर काम करत असताना त्यांनी मोठ्या गांभीर्याने अनेक मोठमोठे ऑपरेशन केले. दिल्लीहून जम्मू-काश्मीरला पोस्टिंगवर पाठविण्यात आलेल्या श्रीवास्तव यांना नंतर सीआरपीएफचे स्पेशल डीजी (ट्रेनिंग) करण्यात आले. ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत श्रीवास्तव यांच्या पथकाने जम्मू-काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिद्दीनच्या सर्व अतिरेक्यांचा खात्मा केला होता.