‘वेल्हा’ तालुक्यास ‘राजगड’ नाव देण्यात यावे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्याला राजगड नाव देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्या किल्ल्यास स्वराज्याची पहिली राजधानी म्हटले जाते तो किल्ला म्हणजे राजगड. आणि हा राजगड किल्ला वेल्हा तालुक्यात आहे. या किल्ल्यावरूच शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ राज्यकारभार पाहिला होता आणि याच किल्ल्यावरून स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले आणि ते अमलात आणले, असे सांगत त्यांनी या तालुक्याचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघात वेल्हा तालुका येत असून या तालुक्यास राजगड नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्या पाठपुरावा देखील करत आहेत. त्यांनी याविषयी मागे मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले होते. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करुन वेल्हे तालुक्यास राजगड नाव देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

विशेष म्हणजे शिवकाळापासून ते १९४७ पर्यंतच्या जुन्या दस्तावेजांमध्ये आत्ताच्या वेल्हा तालुक्याचा ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. १९३९ साली शासकीय मुद्रणालयाने प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात या तालुक्याचा उल्लेख तालुका राजगड असाच करण्यात आला आहे. तसेच इतिहास संशोधन मंडळाकडेही याचा उल्लेख तालुका राजगड म्हणूनच आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वेल्हा तालुक्यातील नागरिकांचे देखील म्हणणे आहे की वेल्हा तालुक्याचे नामांतर करून राजगड करण्यात यावे. राजगड किल्ला हा मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक आहे. शिवाय हा किल्ला वेल्हा तालुक्यात आहे. त्यामूळे या किल्ल्याचे नाव तालुक्यास देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like