२०१९ च्या निवडणुकीत ९० कोटी मतदारांना प्रभावित करणार सोशल मीडिया 

जयपूर : वृत्तसंस्था – पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवणुकीत सुमारे ९० कोटीहून अधिक मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. या निवडणूकीत महत्वाची भूमिका बजावेल ती सोशल मीडिया. या ऑनलाईन लढाईसाठी सत्ताधारी भाजप सज्ज आहे. त्याचवेळी विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे तयार आहे.

काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणूकीत मतदार कोणाला कौल देतो हे सांगता येणार नसले तरी या निवडणूकीत फेसबुक, ट्विटर आणि व्हॉसअॅपची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे येत्या काळात राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावरील लढाई तीव्र होणार आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला होता. मात्र गेल्या चार वर्षांत इतर राजकीय पक्षांनीही सोशल मीडियावर आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरही प्रचाराचा जोर दिसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये दणदणीत यश मिळवल्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा उत्साह दुणावला आहे.

लोकसभेसाठी २०१९ च्या एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे. तसेच फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह सोशल मीडियावरील इतर संकेतस्थळांवरून होणारा प्रचार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सुमारे ९० कोटी मतदार आहेत. त्यापैकी सुमारे ५० कोटी मतदारांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. भारतात सुमारे ३० कोटी फेसबूक युझर्स आहेत. तसेच ३० कोटी युझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच अन्य सोशल मीडिया साइट्वरही मोठ्या प्रमाणावर मतदार अॅक्टिव्ह आहेत.