Coronavirus : सोलापूरचा धोका वाढतोय ! आज 5 नवीन रुग्ण आढळले, एकूण कोरोनाबधितांची संख्या 30 वर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा 5 वाढ झाली आहे. एकूण कोरोना बाधिताची संख्या 30 झाली असून यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 27 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.

आज (मंगळवार) जे पाच रुग्ण मिळून आले आहेत त्यात प्रत्येकी एक मोदी, शास्त्रीनगर झोपडपट्टी, जोशी गल्ली हैदराबाद रोड ,शनिवार पेठ, मदर इंडिया झोपडपट्टी येथील आहेत.
आत्तापर्यंत सोलापुरात 851 कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. यातील 654 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यात 624 निगेटिव्ह तर 30 पॉझिटिव रुग्ण आहेत यातील तिघा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

काटेकोर संचारबंदीस आजच्या दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं .
मात्र काही ठिकाणी विनाकारण काही लोक फिरत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा हुसकावून लावलं.

संचारबंदी आणि लॉक डाऊन काळात सोलापूर शहर पोलिसांनी सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. आज अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तर आत्तापर्यंत 2000 गुन्हे 3 हजार 790 व्यक्तींविरुद्ध दाखल आहेत.
परवानगी नसतानाही मोटारसायकल आणि अन्य वाहनांचा वापर केल्याप्रकरणी आत्तापर्यंत शहरात 5005 मोटरसायकल रिक्षा आणि मोटार कार अशी वाहन पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सोलापूर ग्रामीण हद्दीतही पोलिसांनी अशीच मोठ्याप्रमाणावर कारवाई केली आहे. त्यांनी जप्त केलेल्या वाहनांची संख्या पाच हजाराच्या पुढे आहे.