बार्शी : ‘माझे खरे नाही, माझ्या मुलांना सांभाळा…’; कोरोनाबाधिताची गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार अनेक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर काही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातच आता बार्शी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये बार्शी शहर आणि तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार घेणाऱ्या उमेश भागवत कोंढारे या कोरोनाबाधित रुग्णाने कोविड केअरच्या बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित
उमेश कोंढारे हा 31 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता. त्यानंतर चार दिवस त्याने राहत्या घरीच औषध उपचार घेतले होते. मात्र, त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने 3 एप्रिलपासून बार्शी येथील सीसीसीमध्ये औषध उपचारासाठी दाखल केले होते. त्याचबरोबर त्याचे कुटुंबीय त्याची आई, पत्नी व दोन मुले हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनाही त्याच कोविड केंद्रामध्ये दाखल केले होते.

माझे खरे नाही, माझ्या मुलांना सांभाळा…
उमेश हा काल संध्याकाळपासूनच त्याच्या कुटुंबीयांना माझे काही खरे नाही. मी आता जगत नाही. मला टेन्शन आले आहे. माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळा व तुम्ही व्यवस्थित राहा, अशी सारखी बडबड करत होता. त्यानंतर आज सकाळी साडेचारच्या सुमारास त्याने बाथरूमजवळ साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.