राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्या ‘या’ विद्यमान आमदारांची मुलाखतीला ‘दांडी’ !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या मुलाखतींना राष्ट्रवादीचे विद्यमान दोन आमदारांनी दांडी मारली होती. आता काँग्रेसच्या विद्यमान दोन आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे दोन आमदार भाजपाच्या वाटेवर असलेल्या चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेसकडून आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहेत. या मुलाखतींना काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे अनुपस्थितीत राहिले. हे दोन्ही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु असताना त्यांनी मुलाखतीला दांडी मारल्याने ते भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीला बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पाठ फिरवल्याने ते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनत तर बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांचे सुपुत्र माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छूक आहेत. मात्र, शरद पवार यांनी सारवासारव करत ज्यांना तिकीट निश्चित आहे त्यांनी मुलाखतीला नाही आले तरी चालेल असे सांगून आमदारांच्या पक्ष बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

आरोग्यविषयक वृत्त –