‘सोमेश्वर’चे पडघम वाजले ! निवडणूक कार्यक्रम जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यात अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

कोरोना संसर्गामुळे गेल्या एक वर्षापासून सोमेश्वरच्या निवडणुकीची प्रक्रिया लांबली होती. मात्र शनिवारी कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाला. कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि निवडणूक प्राधिकरण यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तब्बल ३७ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.

दरम्यान, कारखान्याच्या संचालक पदाकरिता अनेक जण इच्छुक असून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. संचालक पदाची माळ आपल्याच गळ्यात कशी पडेल यासाठी जो तो आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात व्यस्त
आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
१५ ते २२ फेब्रुवारी- अर्ज भरणे
२३ फेब्रुवारी छाननी
२४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध
२४ फेब्रुवारी ते १० मार्च – अर्ज माघारी
१२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप
२१ मार्च मतदान
२३ मार्च मतमोजणी आणि निकाल

असे असेल संचालक मंडळ
गट नं. १ निंबुत- खंडाळा ३ उमेदवार
गट नं.२ मुरूम – वाल्हा ३ उमेदवार
गट नं.३ होळ-मोरगाव ३ उमेदवार
गट नं.४ कोर्हाळे -सुपा ३ उमेदवार
गट नं.५ मांडकी- जवळार्जुन ३ उमेदवार
ब वर्ग सभासद १ उमेदवार
अनुसूचित जाती जमाती १ उमेदवार
महिला राखीव २ उमेदवार
इतर मागासवर्गीय १ उमेदवार
भटक्या विमुक्त जाती व जमाती १ उमेदवार