महाविकास आघाडीतील धूसफूस ! आता ‘हे’ ठरले वादाचे कारण; मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे नाराजी

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आहे. तीन पक्ष एकत्र आल्याने या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच कमी- अधिक प्रमाणात मतभेद निर्माण होत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागातील सचिवांच्या निवडीवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

या खडाजंगीनंतर राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यातच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्याऐवजी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकारांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी ही बाब शरद पवारांच्या कानावर घातली आहे. दरम्यान, याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळात चर्चिले गेलेले विषय बाहेर सांगू नयेत, असे मला वाटते. बाकी मला जे काही बोलायचे आहे ते मी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलेन असे ते म्हणाले.