श्रीलंकेसाठी ईस्टर संडे ‘ब्लॅक संडे’ ; कोलंबोत ८ वा बॉम्बस्फोट ; ६ वाजल्या पासून संचारबंदी

कोलंबो : वृत्तसंस्था – ऐन ईस्टर संडे दिवशी श्रीलंकेत सकाळी ८.४५ वाजता झालेलया साखळी बॉम्ब स्फोटांची बातमी ताजी असतानाच आता श्रीलंकेत ८ बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. यात दोन नागरिक ठार झाल्याची माहिती मिळते आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या स्फोटामुळे आता श्रीलंकेत झालेल्या स्फोटांची संख्या आठ झाली आहे. त्या मुळे श्रीलंकेतील संरक्षण खात्याकडून सायंकाळी ६ वाजल्या पासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून, ४०० जण जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला , किंग्सबरी आणि सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, बट्टीकलोआ चर्च, सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

You might also like