गडचिरोली : एसटी बसची पीकअप वाहनाला धडक; 4 ठार 15 गंभीर जखमी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि पीकअप वाहनाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 4 ठार 15 जण गंभीर जखमी झाले. आष्टी-आलापल्ली मार्गावर चंदनखेडी फाट्याजवळ शनिवारी (दि.27 ) हा अपघात झाला. धडक एवढी जबर हाेती की पीकअप वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. जेसीबीने पीकअपचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकला ताब्यात घेतले आहे.

मृतांमध्ये पीकअप चालक साईराम रमेशबाबू सूर्यदेवरा ( वय 35 रा. तेलंगणा राज्य), देवाजी खाेकले, नैना निकुरे ( दाेघेही रा. आवळगाव), अर्चना आवारी (रा. हळदा) आदीचा समावेश आहे. या प्रकरणी शरद निवृत्ती काेल्हे (वय 40) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातून काही मजूर तेलंगणा राज्यातील विजयवाडा जवळील उटकूट येथे मिरची तोडायला गेले होते. होळीचा सण असल्याने ते तेलंगणातील वाहन भाड्याने करून गावाकडे निघाले होते. वाहनात एकूण 18 मजूर होते. चंदनखेडी गावाजवळ भंडाराहून अहेरीकडे येणाऱ्या बसची या वाहनाला जबर धडक बसली. यात पीकअप चालकासह 1 मजूर जागीच ठार झाला 2 मजूर गडचिराेली रूग्णालयात मृत्यू पावले. जखमीवर गडचिरोली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.