ना ढोलकीचा ताल… ना घुंगराचा छनछनाट ! लॉकडाऊनमुळे कलाकेंद्रे बंद, हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अशोक बालगुडे) – कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आणि सर्वत्र लॉकडाऊनचा नारा सुरू झाला. त्यामुळे भारत देशामध्येसुद्धा 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू केले, त्यामुळे काम बंद असल्याने कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांसमोर देखील आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घुंगराचा छनछनाट, डोलकीचा ताल अन् टाळ मृदुंगाचा नाद हा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांवर ती उपासमारीची वेळ आली. अशीच वेळ लावणी सादर करणाऱ्या कलावंतांवरही आलेली आहे.

कोरोनामुळे राज्यभरातील यात्रा-जत्रा उत्सव बंद आहेत. त्यामुळे तमाशा कलावंतांचा व्यवसायसुद्धा ठप्प आहे. राज्यभरात असंख्य कला केंद्र आहेत. या कला केंद्रांवर कलाकार लावण्या सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करतात. घुंगरांचा छनछनाट अन् टाळ-मृदुंगाचा नाद कानी पडल्यानंतर अनेक रसिक यात मंत्रमुग्ध होऊन जातात. पण कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व कला केंद्र बंद आहेत.

दौंड तालुक्यासह अनेक ठिकाणी कला केंद्रे आहेत, त्यांचीही अशीच अवस्था आहे. नेहमी गजबजलेलं व टाळ-मृदुंगाचा व घुंगराच्या नेहमी या ठिकाणी आवाज येत असतो. मात्र, सध्या या ठिकाणी शांतता पसरलेली आहे. पोटासाठी नाचताना कशाचाही परवा न करणाऱ्या कलाकारांचा आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या लावणीतून ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ असं म्हणणाऱ्या लावणी कलाकारांची आता पोटाला चिमटा काढून उपाशी मरण्याची वेळ आली आहे.

राज्यातील इतर कला केंद्रांची हीच अवस्था आहे. तमाशा कला केंद्रांमध्ये शेकडोंनी कलाकार काम करीत असतात. लॉकडाऊनमुळे येथील सर्व कलाकारांनी घरचा रस्ता धरला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नाच गाण्याचा मार्ग स्वीकारलेल्या या कलावंतांना आता उपासमारीची वेळ येते की काय असे समस्या उभी राहिलेली आहे. राज्यभरातील लावणी कलावंत आपल्या कला केंद्र मालकांना फोन करून केंद्र केव्हा चालू होणार आहेत, याची विचारपूस करू लागले आहेत. अगोदरच नोटाबंदीमुळे अडचणीत आलेली कला केंद्र तग धरण्यास सुरुवात होताच कोरोनाच्या महामारीमुळे आता उद्ध्वस्त होतात की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शासनांच्या नियमांचे पालन करीत हे कला केंद्र सुरू व्हावेत, अशी मागणी कलाकारांकडून केली जात आहे.

मोडनिंब येथील पद्मावती कलाकेंद्राचे मालक अभयकुमार मुसळे म्हणाले की, शासनाने एकीकडे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही नियम देऊन हे उद्योगधंदे सुरू केलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती तेथील कामगार व मालकांना दिलासा मिळालेला आहे. याच स्वरूपातही जर कलाकेंद्रही सुरू करण्यासाठी काही अटी देऊन मान्यता दिली. तर नक्कीच पोटासाठी नाचणाऱ्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार नाही. तमाशा कलावंत हातावर पोट असलेला कलाकार आहे. कला सादर करून मनोरंजन करतात. त्यातून स्वतःबरोबर कुटुंब चालवतात. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर व्यवसाय-धंदे, दुकानी सुरू केली आहेत. कलावंत दुसरे काम करू शकत नाही. त्याप्रमाणे आरोग्य किंवा गृह विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली करून कलाकारांनासुद्धा कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी. ही नियमावली कलाकार आणि केंद्रमालकसुद्धा पालन करतील.

सणसवाडी येथील लावणी कलाकार रेश्मा परितेकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुस, यात्रा, उत्सव बंद आहेत, कला केंद्रामध्ये संगीतबारीसुद्धा बंद आहे. त्यामुळे कलाकार गावाकडे निघून गेले आहेत. मात्र, दोन महिन्यानंतर त्यांना कलाकेंद्र सुरू करून त्यांची रोजीरोटी सुरू होऊन त्यांची उपासमार थांबेल. त्यासाठी आता कलाकेंद्रांना परवानगी देण्याची गरज आहे.

सणसवाडीयेथील तमाशा फडमालक सुरेखा पवार म्हणाल्या, एका कला केंद्रामध्ये सुमारे 300-400 कलाकार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या मागे कुटुंब आहे. मात्र, लॉकडाऊन केले जाणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर कला कारगावाकडे गेले आहेत. मात्र, आता त्यांच्याजवळील पुंजी संपली आहे, कलाकेंद्र लवकर सुरू करा, असे सांगत आहेत. शासनाने कलाकारांसाठीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून, कलाकेंद्र सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे.