नगरमध्ये उत्पादन शुल्कची छापेमारी, राजकीय पुढाऱ्याच्या हॉटेलवरही छापा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाईन्स तसेच हॉटेलवर राज्य उत्पादक शुल्क विभाग, अहमदनगरच्या खात्याने मोठी कारवाई केली. तब्बल १२ ठिकाणी छापे टाकून ७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ६२ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत राजकीय पुढाऱ्यांचे हॉटेल तसेच वाईन्सच्या दुकानांचा समावेश असल्याने खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना धडकी भरली आहे.

सदरच्या हॉटेल व वाईन्स दुकानांनी नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ड्राय डे च्या दिवशी मद्यविक्री करणे, दुकाने अथवा हॉटेल्स् वेळेआधी सुरु करणे, स्टॉक मोजणी नसणे, विनापरवाना मद्यविक्री करणे, नोंदवही न ठेवणे अशा प्रकारच्या मुद्यांवरुन राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरला नुकतीच भेट दिली होती. या भेटीत सहारिया यांनी निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले होते. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेशही दिले होते. याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली.

राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी.पी.निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून कारवाई केली. संबंधितांवर गुन्हेही दाखल करून ७८ आरोपींना अटकही करण्यात आली. संबंधित हॉटेल व वाईन्स दुकानांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत कारवाई करण्यात आली. सदरच्या व्यावसायिकांना आता तीन दिवसांच्या आत म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले असून, त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवलकर यांनी दिला. या धडक कारवाईमुळे राजकीय पुढाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

एकाच गावात आठवडाभरात सापडले तीन महिलांचे मृतदेह


अहमदनगर : 
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे एका चाळीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला आहे. मयत सुषमाबाई भाऊसाहेब जऱ्हाड या महिलेने आत्महत्या केली का काही घातपात झाला याबाबत गावात चर्चा होत आहे. सदर महिला ही विधवा असून, या महिलेस एक मुलगा व एक मुलगी आहे. एकाच गावातील आठ दिवसात ही तिसरी घटना घडल्याने राळेगण थेरपाळ गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

या आधी चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाला होता. तसेच अपहरण झालेल्या दिव्या कारखीले हिचा मृतदेह विहिरीत सापडला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सुषमाबाई भाऊसाहेब जऱ्हाड (वय ४०) ही महिला दुपारी घरातून शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली संध्याकाळी एक शेळी परत आली परंतु रात्र होऊनही संबंधित महिला घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, शेतालगतच्या विहिरीजवळ या महिलेच्या चपला व एक शेळी बांधलेली आढळून आल्यामुळे सदर महिला विहिरीत असल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने विहिरीत शोधाशोध केली असता विहिरीत सदर महिलेचा मृतदेह सापडला.