निरपराध परिवाराला तुरुंगात डांबणाऱ्या पोलिसांना ‘दंड’ ! खुन झालेली पत्नी पोलीस ठाण्यात झाली होती ‘हजर’

पाटणा : वृत्तसंस्था – बनावट केस रिपोर्ट करुन निरपराध परिवाराला तुरुंगात डांबणाऱ्या बिहार पोलिसांना ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला. पोलिसांच्या त्यांच्या पगारातून हा दंड कापून घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याबाबतची माहिती अशी, वेश्या व्यवसायातील एजंटच्या जाळ्यात अडकून बिहारमधील सुपौलमधील एक महिला सोनिया दिल्लीत पोहचली.

२४ नोव्हेंबर २०१८ रोजी सुपौलमध्ये एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तिची डिएनए चाचणी घेऊन बेपत्ता असलेल्या सोनिया हिचाच हा मृतदेह असल्याची कागदपत्रे तयार केली व तिचा खुन केला म्हणून पती रंजीत पासवान आणि त्यांच्या आईवडिलांना अटक करुन तुरुंगात टाकले. त्यांच्याविरुद्ध खटलाही दाखल केला.

खुनाचा आरोप असल्याने त्यांना जामीन न मिळाल्याने त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पासवान कुटुंबाला तब्बल ६ महिने तुरुंगात राहावे लागल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. इकडे दिल्लीत वेश्या व्यवसायात अडकलेल्या सोनिया हिची तब्बल दीड वर्षानंतर सुटका झाली. ती सुपौलला परत आली. तेव्हा तिला आपल्या खुनाबद्दल पती व सासुसासरे यांना तुरुंगात डांबले असल्याचे समजले. तेव्हा ती थेट पोलीस ठाण्यात गेली.

पोलिसांनी न्यायालयात याचा अहवाल दाखल केला. तेव्हा न्यायालयाने रंजीत व त्याच्या आईवडिलांशी खुनाच्या आरोपातून सुटका केली व बनावट केस रिपोर्ट तयार करुन निरपराध कुटुंबाला तुरुंगात डांबणाऱ्या पोलिसांना ६ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा दंड तपास करणाऱ्या पोलिसांच्या पगारातून कापून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. दुसरीकडे सोनियाचा म्हणून जो मृतदेह पोलिसांनी जाहीर केला होता. तो मृतदेह कोणत्या महिलेचा होता, हे अद्याप उघडकीस येऊ शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा –