बसमधील ३० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिकंदराबाद ते मुंबई दरम्यान खासगी बसमधून प्रवास करीत असताना मोटारीतून आलेल्या दोघांनी बसमधील ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने असलेली बॅग चोरुन नेली. ही घटना पुनावळे येथील सागर हॉटेलबाहेर १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली.

याप्रकरणी दीपक पुरुषोत्तम सैनी (वय २४, रा. हैदर वस्ती, तेलंगणा) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सैनी हे सिकंराबाद येथे भवानी एअर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीत गेल्या २ वर्षांपासून कामाला आहे. ही कंपनी सोने व सोन्याचे दागिने, डायमंड इत्यादीचे पार्सल व्यापाऱ्यांकडून घेऊन कुरिअरने दुसऱ्या व्यापारी, ग्राहकांना वितरित करण्याचे काम करते. सैनी हे सिकंदराबाद ते मुंबई दरम्यान खासगी ट्रॅव्हल बसने मुंबईला जात होते. १४ फेब्रुरीला सकाळी आठ वाजता बंगलोर -मुंबई महामार्गावरील पुनावळे येथील सागर हॉटेलसमोर थांबली होती.

या वेळी सैनी हे खाली उतरले असताना मोटारीतून दोघे जण आले. त्यांनी बसमध्ये जाऊन बसमधील सीटखाली ठेवलेल्या बॅगमधील ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व डायमंड चोरुन नेले. ही बाब सैनी यांना मुंबईला पोहचल्यावर समजली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.