छेडछाडीची विचारणा केल्याने रोडरोमिओंची शिक्षकांवर दगडफेक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थिनींची छेडछाड का करता, अशी विचारणा केल्याच्या रागातून आठ ते दहा रोडरोमिओंनी शिक्षकांवर दगडफेक केली. आज दुपारी लालटाकी रस्त्यावरील रेसिडेन्शिअल हायस्कूल परिसरात ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रस्त्याने ये-जा करणारे काही टारगट मुले विद्यार्थिनींची छेडछाड करीत होते. ही घटना विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या कानावर घातली. रेसिडेन्शिअल हायस्कूल परिसरात त्यातील एक मुलगा आज आला होता. विद्यार्थिनींनी तो शिक्षकाला दाखवला. शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला मुलींची छेडछाड का करतो, तसे केल्यास तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे समजावले. संतापलेल्या रोडरोमिओ तिथून निघून गेला.

काही वेळानंतर आठ ते दहा जणांचे टोळके घेऊन आला शिक्षकांना शिवीगाळ, दमदाटी करू लागला. तसेच शिक्षकांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विद्यार्थिनींची छेडछाड केल्याची विचारणा केल्याच्या रागातून शिक्षकांवर दगडफेकीच्या घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Visit – policenama.com