‘आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बंद करा, मग गाझीपूरला जावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीच्या सीमारेषावर सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता जगभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. राजकीय पक्षाचे नेतेही दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊन शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आशिष शेलार म्हणाले, आंदोलकाना कोणी, केव्हा, कसं भेटावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु सुप्रिया सुळे गाझीपूरला जात असतील तर अगोदर त्यांनी बारामतीमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बंद करावं.

आशिष शेलार म्हणतात, बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग का करताय. याचं उत्तर आधी सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आधी बंद करा मग आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला गाझीपूरला जा असा टोला त्यांनी लगावला आहे.

विरोधकांचं शिष्टमंडळ नुकतंच गाझीपूर सीमेवर पोहोचलं आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. शिवसेना नेत्यांनंतर आता विरोधकाच्या शिष्टमंडळानं शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. सुप्रिया सुळे आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.