ममता बॅनर्जी अपघातात झाल्यात जखमी, हल्ल्याचा पुरावा नाही; EC च्या निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान झालेल्या अपघातात जखमी झाल्या, त्यांच्यावर हल्ल्याचा पुरावा मिळालेला नाही. असे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक विवेक दुबे आणि अजय नायक यांच्याकडे अहवाल मागविला होता. पायाच्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी असा दावा केला की 4-5 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि जाणीवपूर्वक त्यांना जखमी केले.

एका अहवालातील सूत्रांचा हवाला देत म्हटले की, विशेष निरीक्षकांनी हल्ल्याची कोणतीही शक्यता नाकारली आहे. निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की हल्ल्याचा पुरावा मिळालेला नाही. ममता यांना दुखापत झाली तेव्हा त्या मोठ्या पोलिस सुरक्षेत होत्या. पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचे वर्णन करीत आज निवडणूक आयोगाने मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना रविवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

बुधवारी सायंकाळी झालेल्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडून अहवाल पाठवून राज्यासाठी दोन निरीक्षकांची नेमणूक केली. विशेष पोलिस निरीक्षक विवेक दुबे आणि विशेष निरीक्षक अजय नायक यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली व त्यानंतर अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला. पश्चिम बंगाल सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात म्हटले की, नंदीग्राममध्ये 10 मार्च रोजी ममता बॅनर्जी यांना कारच्या दरवाजामुळे दुखापत झाली. दरम्यान, कारच्या दरवाजामुळे त्यांच्या पायाला कसा मारला लागला ते सांगण्यात आले नाही. इजा कशी झाली हे सरकारच्या अहवालात स्पष्ट झालेले नाही, असे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीबद्दल सहानुभूती मिळवण्याची नौटंकी असल्याचे वर्णन केले आहे, तर तृणमूल कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपवर दोषारोप करीत आहेत. महत्त्वपूर्ण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी वेगवेगळ्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला जाईल. राज्यात विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत.