PPE किट परिधान करून चोरट्यांचा दुकानातील दागिन्यांवर डल्ला, घटना CCTV त कैद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई किट) आता चोरटे देखील चोरी करण्यासाठी वापरू लागले आहेत. त्यांचा उद्देश कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरटे पीपीई किटचा वापर करत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. चोरट्यांनी चक्क पीपीई किट घालून दागिन्याच्या दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून 780 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फलटण भागातील एका दुकानात घडली असून ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांनी टोपी, मास्क, प्लास्टिकच्या जॅकेटसह हातमोजे घालून दुकानात चोरी करताना दिसून येत आहेत.

दागिन्याच्या दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीवरुन फलटण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालकाच्या तक्रारीनुसार चोरट्यांनी दुकानातील 78 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास फटलण पोलीस करत आहेत.