धुळ्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घटसर्पाची लागण ? तब्बल ९४ विद्यार्थ्यांची तपासणी सुरू 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सामोडे येथील एका आश्रम शाळेत घटसर्पाने एका विद्यर्थीनीचा मृत्यू झाल्यानंतर आता इतर विदयार्थ्यांना देखील घटसर्पाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या विद्यार्थ्याना धुळे शहरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून तब्बल ९४ विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे.
काय आहे प्रकरण 
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील माधवस्मृती आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीला घटसर्प आजाराची लागण झाली होती. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. परंतु, याठिकाणी असणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. खबरदारीचा उपाय म्हणून या विदयार्थ्यांना धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असून तब्बल ९४ विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्यांचा तपासणी अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांची पुढील तपासणी करून उपचार करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी दिली. एकीकडे शासन आश्रमशाळांवर लाखो रुपये खर्च करते, मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे ही आश्रमशाळा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी पगारे यांची असून या घटनेमुळे आश्रमशाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घटसर्प रोगाविषयी 
घटसर्प हा Corney Bacterium Diphtheria नावाच्‍या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्‍य रोग असून त्‍यामुळे घसा व टॉन्सिल्‍स यांचा संसर्ग होऊन त्‍यावर तयार झालेल्‍या पडदयामुळे श्‍वासास अडथळा तसेच मृत्‍यु होऊ शकतो. घसा खवखवणे, सौम्‍य ताप, घशामध्‍ये राखडी रंगाचा पडदयाचा पट्टा किंवा पट्टे अशी या रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार घटसर्पाचा जीवाणू जंतुसंसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तोंड, नाक व घसा या भागात वास्‍तव्‍य करतो. खोकला व शिंकेच्‍या माध्‍यमातून तो एका व्‍यक्‍तीकडून दुस-या व्‍यक्‍तीपर्यंत पसरतो.
रोगप्रतिबंधक उपाययोजना
बालपणाच्‍या सुरुवातीच्‍या काळात डीपीटी (घटसर्प, डांग्‍या, खोकला व धर्नुवात यांचे एकञीत ट्रीपल) लसीकरण ही प्रतिबंधाची सर्वांत प्रभावी पध्‍दत आहे. लसीकरणाच्‍या अभावी १४ वर्षापर्यंतची बालके घटसर्प रोगाच्‍या जंतुसंसर्गाला वारंवार संवेदनशील आहेत. लसीकरण कार्यक्रमाच्‍या वेळापत्रकानुसार डीपीटीचे लसीकरण देण्‍यात येते.