कौतुकास्पद ! पोलिस उपनिरीक्षक दररोज देतात मजुरांच्या मुलांना शिक्षणाचे ‘धडे’

बंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून देशातील शाळा बंद आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आले. मात्र, अनेक भागात शाळकरी मुलांकडे मोबाइल, इंटरनेट आणि नेटवर्कची उलपब्धता नसताना बंगळुरू मधील एका पोलिस अधिकऱ्याने केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आले. पण अतिदुर्गम भागात इंटरनेट मिळवण्यासाठी मुलांसोबत शिक्षकांनाही उंच ठिकाणी, छतावर किंवा झाडावर चढून धडपड करावी लागत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. ही स्थिती पाहून बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरनगरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शांताप्पा जमदेम्मनवार यांनी सुरु केल्या शैक्षणिक उपक्रमाची समाज माध्यमावर प्रशंसा होत आहे.

आपल्या कामावर जाण्यापूर्वी शांताप्पा जमदेम्मनवार हे दररोज मजुरांच्या मुलांना शिकवतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून हा उपक्रम सुरु केल्याचं त्यांनी म्हटलं. मुले रस्त्यांवर फिरतात. ऑनलाइन वर्ग करत नाहीत. त्यांचे आई-वडील कामाला जातात, मात्र या मुलांना औपचारिक शिक्षण मिळत नाही. शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना त्यांची परिस्थिती पाहून दुःख होत असल्याचं त्यांनी म्हटलं. ते या मुलांना वैदिक गणित शिकवतात आणि आकडेमोड करण्यासोबत सामान्य ज्ञान आणि नैतिक मूल्यांवर धडे सुद्धा शिकवतात. पेन, पेन्सिल किंवा वापर न करता त्यांना मनाने आकडेमोड करण्याचे प्रशिक्षण देतो. यामुळे त्यांच्यात शिकण्याची मनापासून गोडी तयार होते, असे शांताप्पा याचे मत आहे.

लोकांकडून मिळते मुलांना मदत

>> दररोज तासभर मुलांना शिकवण्याचा माझा मानस असतो. ज्यावेळी अधिक वेळ मिळतो तेव्हा दीड तास शिकवतो. आता मी व्हाईटबोर्डवर शिकवीत आहे.
>> समाज माध्यमावर छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोकांनी हातभार लावत मुलांना दप्तर, पुस्तके आणि सौर दिवे दिले आहेत.