सुधा भारद्वाज यांची जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या याचिकेवर १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार एल्गार परिषदेमुळे झाला आहे. तसेच बंदी घातलेल्या माओवादी संघटना सीपीआयशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या कारणावरून पुणे पोलिसांनी दहा सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत यांना अटक केली आहे. त्यात सुधा भारद्वाज यांचा समावेश आहे. पुणे सत्र न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीन अर्ज ऑक्टोबर, २०१८ मध्ये फेटाळल्यानंतर भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

सुधा भारद्वाज यांच्याविरोधात पुरावे म्हणून पुणे पोलिसांनी सादर केलेल्या चार पत्रांचा आधार घेत,  न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळला. परंतु भारतीय पुरावे कायद्यांतर्गत ते पुरावे मान्य करून घेण्याजोगे नाहीत, असा युक्तिवाद भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी केला.