शिवस्मारकाचे कामकाज सध्या बंदच राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे काम तुर्तास बंदच राहणार आहे. राज्य शासनाने स्मारकाविरोधातील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र ही सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकारला एका स्वयंसेवी संस्थेने विरोध दर्शवला आहे. कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट या संस्थेने हा विरोध केला आहे. शिवस्मारकामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती देण्यात यावी, असं संस्थेचे म्हणणं आहे. या संस्थेच्यावतीने देबी गोयंका यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, स्मारकाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. ज्याने निवडणुकांपुर्वी शिवस्मारकाच्या बांधकामाला सुरुवात होईल. मात्र गुरुवारी कोर्टाने शासनाची ही विनंती अमान्य केली आहे. त्यामुळे शिवस्मारकाचे काम तुर्तास बंदच राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनावर नामुष्की ओढवली आहे.