सुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा स्थगितीची याचिका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सुप्रीम कोर्टा( Supreme Court)नं बुधवारी यूपीएससी सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा पुढे स्थगित करण्यासंदर्भातील याचिका फेटाळली. ही याचिका सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा देणार्‍या काही उमेदवारांकडून सुप्रीम कोर्टा (Supreme Court) त दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये 4 ऑक्टोबरला होणारी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. कोर्टाने स्पष्ट केले की, परीक्षा स्थगित होणार नाही आणि चार ऑक्टोबरलाच होईल.

न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने म्हटले की, त्यांनी या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यावर विचार करावा जे कोविड महामारीमुळे आपल्या अंतिम प्रयत्नात सहभागी होऊ शकणार नाहीत. पीठाने सिव्हिल सेवेची 2020 ची परीक्षा 2021 च्या सोबत जोडून आयोजित करण्याच्या विचारास नकार दिला आणि म्हटले की, याचा प्रतिकूल परिणाम होईल. पीठ कोविड-19 महामारी आणि पूराच्या स्थितीमुळे आयोगाची सिव्हिल प्रारंभिक 2020 परीक्षा दोन ते तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याच्या हेतूने दाखल याचिकेवर सुनावणी करत होते.

संघ लोकसेवा आयोगाने याचा विरोध करत म्हटले की, 4 ऑक्टोबरला परीक्षेच्या आयोजनासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. यूपीएससीचे म्हणणे होते की, पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही परीक्षा 31 मेरोजी होणार होती, परंतु यावेळी स्थगित केल्यानंतर अखेर 4 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय करण्यात आला. आयोगाने स्पष्ट म्हटले होते की, ही भारत सरकारची मुख्य सेवांसाठी परीक्षा आहे आणि ती आता आणखी स्थगित करणे अशक्य आहे.

न्यायालयाने म्हटले की, ज्या उमेदवारांकडे परीक्षा देण्याची शेवटची संधी आहे आणि कोविड-19 च्या कारणामुळे देऊ शकत नाही, त्यांना आणखी एक संधी देण्यावर विचार करा.न्यायालयाने कोरोना संक्रमित उमेदवारांना परीक्षेत सहभागी होणे आणि वेगळ्या प्रकारे परीक्षा देण्यास परवानगी दिली नाही.

कोर्टाने म्हटले की,मेडिकल प्रोटोकॉलमध्ये कोरोना संक्रमित व्यक्तीसाठी क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.यूपीएससीने कोर्टाला सांगितले होते की, खोकला आणि सर्दीची लक्षणे असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला वेगळ्या खोलीत बसवले जाईल. ही सिव्हिल सेवा प्रारंभिक परीक्षा 4 ऑक्टोबरला देशातील 72 शहरांच्या2569 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.