फ्लॅट देण्यास उशीर झाल्यास बिल्डरने वर्षाला 6 % व्याज घर खरेदी करणार्‍याला द्यावं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने DLF Southern Homes Pvt Ltd आणि अ‍ॅनाबेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (Annabel Builders & Developers Pvt Ltd) यांना दरवर्षी खरेदीदारास फ्लॅटच्या किंमतीवर 6% व्याज देण्यास सांगितले आहे. हे दोन्ही बिल्डर बंगळुरूमध्ये फ्लॅट्स बांधत आहेत. खंडपीठाने म्हटले आहे की ज्या खरेदीदारांचे फ्लॅट वितरण 2 ते 4 वर्षांनी लांबणीवर पडले आहे अशांना बिल्डर व्याज देतील. Southern Homes Pvt Ltd ला आता बेगुर ओएमआर होम्स प्रायव्हेट लिमिटेड (BEGUR OMR Homes Pvt Ltd) म्हणून ओळखले जाते.

एनसीडीआरसीचा आदेश रद्द

सर्वोच्च न्यायालयाने 2 जुलै 2019 रोजी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग (NCDRC) चा तो आदेश देखील रद्द केला, ज्यामध्ये 339 फ्लॅट खरेदीदारांची तक्रार खारीज करत सांगितले की आश्वासनानुसार विलंब झाल्यास किंवा सुविधांची उपलब्धता न झाल्यास फ्लॅट खरेदी करारात ठरविलेल्या रकमेपेक्षा जास्त भरपाई मिळण्यास ते पात्र नाहीत.

खंडपीठाने म्हटले आहे की, फ्लॅट वितरणाला दिरंगाई झाल्यास बिल्डर पूर्वीप्रमाणे 5 रुपये प्रति चौरस फूट दंड भरेल. यासह आता बिल्डरांना घर खरेदीदारांना फ्लॅटच्या किंमतीवर 6 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. खंडपीठाने म्हटले की सुरुवातीला बांधकाम व्यावसायिकांना वार्षिक 6 टक्के व्याज द्यावे लागेल. परंतु फ्लॅट ताब्यात देण्यास 36 महिन्यांपेक्षा जास्त उशीर झाल्यास ताब्यात येईपर्यंत कंपाऊंड व्याजाच्या हिशोबाने दंड भरावा लागेल.